सैन्याचे बनावट ओळखपत्र बाळगणारा अखेर गजाआड; सहा महिन्यानंतर उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:38 PM2019-05-26T22:38:39+5:302019-05-26T22:41:38+5:30
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले.
नाशिक : वर्षभरापुर्वी एका अज्ञात जागरूक नागरिकाला गांधीनगर येथील ‘कॅटस्’च्या जवळ सैन्याचे ओळखपत्र, एटीएमकार्ड रस्त्यावर आढळून आले. त्याने तत्काळ हे दस्तऐवज कॅटस्च्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात जवानांकडे सोपविले. त्या जवानांनी ते ताब्यात घेऊन वरिष्ठांकडे दिले. ओळखपत्र चौकशीसाठी उडीसा येथे लष्कराच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आले. तेथे ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवळाली येथील लष्कराच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांनी चौकशी करत ओळखपत्रावरील बनावट सैन्यअधिकारी संशयित नवनाथ युवराज जाधव (रा.कमलनगर, हिरावाडी) यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत देवळाली कॅम्प पोलीसांच्या हवाली केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. त्यांनी हे ओळखपत्र व एटीएम कार्ड छाननीसाठी देवळाली मुख्यालयाकडे पाठविले तेथे ओळखपत्रावरील छायाचित्र इंग्रजी नाव तसेच लष्काराचे क्रमांक आदिबाबत पडताळणी करण्यात आली; मात्र त्यावरून फारसे स्पष्ट न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळखपत्र उडीसा राज्यातील लष्कराच्या ए.ए.डी केंद्राकडे तपासणीसाठी रवाना केले. केंद्राने ओळखपत्रावरील क्रमांकासह आदि माहिती व इसमाच्या छायाचित्राअधारे तपास करून अशा नावाची व्यक्ती सैन्यदलात नसून असे कोणतेही ओळखपत्र केंद्राकडून दिले गेले नसल्याचे निष्पन्न केले. एटीएम कार्डावरून केंद्रातील गुप्तहेर अधिकारी-कर्मचा-यांनी संशयित व्यक्तीचा नाव, पत्ता आदि माहिती संकलित करून ही व्यक्ती बनावट ओळखपत्र बाळगणारी असल्याची खात्री पटवून देवळाली मुख्यालयाला माहिती कळविली. त्यानंतर सदन कमांडंट लायझन युनीट यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी मागील महिन्यात दिली गेली. युनीटने याबाबतची जबाबदारी सुभेदार शशी कुमार, हवालदार धीरज सोनार यांच्याकडे गेल्या शनिवारी (दि.१८) सोपविली. या दोघा जवानांनी आठवडाभरात संशयित जाधव याचा छडा लावून शानिवारी (दि.२५) सापळा रचून मुसक्या आवळल्या.
त्याच्याविरूध्द सुभेदार जयदेव वाडीलाल जोशाी यांनी देवळाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी भारत सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा जाधवविरूध्द दाखल केला आहे. त्यास पोलिसांनी रविवारी (दि.२६) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक निरिक्षक वाल्मिक शार्दुल करीत आहेत.