न्यायडोंगरी निवडणुकीत सेनेची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:03 PM2020-12-18T19:03:07+5:302020-12-19T01:00:28+5:30
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सर्वात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडल्याने निवडणुकीत पक्षाची कसोटी लागणार आहे तर तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.
सहा वॉर्डमध्ये १७ सदस्य असलेल्या या निवडणुकीत ९ हजारच्या पुढे मतदार आहेत. २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत ७० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती विलास आहेर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधले तर शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत मोरे यांनी बंडखोरी केल्याने येथे शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करणे आमदार सुहास कांदे यांच्या समोर मोठे आव्हान होऊन बसले आहे.
न्यायडोंगरी माजी आमदार अनिल आहेर यांचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेला पहिला पराभव आहेरांचा जिव्हारी लागला होता. या वेळेस आपला गड मिळविण्यात ते किती कसब वापरतात, याकडे सर्वांची नजर आहे. आमदार सुहास कांदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विलास आहेर यांच्याकडे शिवसेना पॅनलचे नेतृत्व राहील, तर शशिकांत मोरे यांच्या स्वतंत्र पॅनल चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे झाले तर न्यायडोंगरीत तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर चुरस वाढणार!
माजी सरपंच संजय आहेर व वैशाली चव्हाण यांनी दोन वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपली उमेदवारी राखण्यात यश मिळवतील काय, याकडेही लक्ष लागून असणार आहे. माजी आमदार अनिल आहेर, माजी सभापती विलास आहेर, शशिकांत मोरे हे तिन्ही नेते निवडणुकीसाठी सरसावले आहेत. निवडणूक पक्षीय पातळीवर झाल्यास चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.