सिन्नर तालुक्यातील धरणांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 05:54 PM2019-04-28T17:54:35+5:302019-04-28T17:55:27+5:30
सिन्नर :तालुक्यातील पाच मोठ्या धरणांपैकी एका धरणात मृतसाठा शिल्लक असून, उर्वरित चार धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अवैध पाणी उपशाविरोधात कडक कारवाईचे धोरण न बाळगल्याने या धरणांमध्ये केवळ चार टक्के साठा शिल्लक आहे.
धरणांमध्ये शिल्लक असलेल्या मृतसाठ्यावर पाणी योजना चालवाव्या लागत आहे. पाचही धरणांत सद्यस्थितीत जलसाठे पिण्यासाठी आरक्षित असून, एकूण केवळ २५ दलघफू (४.३ टक्के) साठा शिल्लक राहिला आहे. सरदवाडी धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. बोरखिंडला ५, ठाणगाव येथे ४ तर कोनांबेत २ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोन करताना कसरत करावी लागेल. भोजापूर धरणात मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे अवलंबून आहेत. या धरणात १०७ लशलक्ष घनफूट मृतसाठा असल्याने रोजचा ०.५ दशलक्ष घनफूट इतका पाणी वापर पाहता जूनपर्यंत पाणी पुरू शकेल. मात्र, यंदा पाऊस लवकर न झाल्यास ठाणगाव, सरदवाडी व बोरखिंड धरणावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावी लागण्याची चिन्हे आहे.