दीड हजार विद्यार्थी रस्त्यावर
By admin | Published: September 14, 2016 11:47 PM2016-09-14T23:47:53+5:302016-09-15T00:00:47+5:30
घोटी : भुयारी मार्गाच्या मागणीसाठी आंदोलन
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी शिवारात असलेल्या कै. पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे आज सकाळी अपघाती निधन झाल्यानंतर महाविद्यालयासमोर भुयारी महामार्ग निर्माण करावा, या मागणीसाठी आज महाविद्यालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी घोटी टोलनाक्यावर अघोषित रास्ता रोको आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प केली. दरम्यान, याबाबत टोलनाका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
इगतपुरी येथील कै. पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अजय बाजीराव नाठे व नीलेश पांडुरंग लहाने यांचा आज
सकाळी टाके घोटी शिवारात अपघात होऊन यातील संजय नाठे याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असुरक्षित असल्याने महाविद्यालयासमोर भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड निर्माण करावा अशी मागणी सातत्याने करूनही महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला.
याबाबत आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाके घोटी येथील महाविद्यालयापासून मूक मोर्चा काढीत महामार्ग प्राधिकरणाच्या गचाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. हा मोर्चा घोटी येथील टोलनाक्यावर आल्यानंतर मोर्चात सहभागी सुमारे दीड हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हा रस्ता रोखून धरीत महामार्ग वाहतुकीकरिता बंद केला. यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या.
दरम्यान, टोलनाका प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. भुयारी महामार्ग व सर्व्हिसरोड ही बाब महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याने याबाबत संबंधित खात्याला कळविले जाईल, अशी मध्यस्थी घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात महाविद्यालयाचे प्रा. व्ही. जे. मेदने, पी. जी. खळे, पी. एन. पाटील, डी. एन. पाटील, अहेर, कार्यालयीन अधीक्षक मते, कापडी, मगर, काळे, थेटे आदिंसह सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. (वार्ताहर)