मंगरूळच्या निवारागृहात ८४ मजुरांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:35 PM2020-05-04T21:35:36+5:302020-05-04T23:01:34+5:30
चांदवड (महेश गुजराथी) : कोरोना विषाणू अर्थात कोविड -१९ ची चाहूल देशभरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागताच सर्वत्र देशभर शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली.
चांदवड (महेश गुजराथी) : कोरोना विषाणू अर्थात कोविड -१९ ची चाहूल देशभरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागताच सर्वत्र देशभर शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह चांदवड तालुक्यातील महसूल, प्रशासकीय, पोलीस यंत्रणेनेदेखील सर्वच जय्यत तयारी करून ठेवली होती. त्यात कोरोेनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांसाठी निवारागृह व क्वॉरण्टाइन कक्ष उभारण्यात आले. चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पुंजाराम जाधव यांच्या
रेणुका इव्हेंट हॉलमध्ये अशा प्रकारची सुविधा करून ठेवली आहे.
पुणे व मुंबई येथून निघालेल्या ८४ मजुरांना दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मालेगाव हद्दीत पोलिसांनी अडविले. हे मजुर काही दुचाकी, काही चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे जात असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांना चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील रेणुका इव्हेंट हॉलमधील क्वॉरण्टाइन कक्षात ठेवले. त्या दिवसापासून आतापर्यंत (दि. ४ मेपर्यंत) या मजुरांना येथेच ठेवण्यात आले आहे. त्यांची मंगरुळ येथील तेजबहादूर गुरुद्वारा प्रबंध समितीच्या लंगरमार्फत सुखीसिंग, गोगीसिंग, सुरजितसिंग सैनी, बलदेवसिंग रॉय, रवी मंजाल, बुटासिंग व शीख बांधव यांनी एक वेळ नास्ता, चहा, दोन वेळचे जेवण अशी व्यवस्था केली आहे. गुरुद्वारा प्रबंध समितीने या ८४ मजुरांव्यतिरिक्त रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना अन्न, पाणी, चहा, नास्ता उपलब्ध करून दिला आहे.
याशिवाय लोकसहभागातून चांदवड येथील व्यवहारे वस्रालयाचे दीपक दत्तात्रय व्यवहारे यांनी त्यांच्या फाउण्डेशनच्या वतीने या मजुरांना अंर्तवस्त्रे उपलब्ध करून दिली, तर हिरा नगिना यांच्या वतीने साबण, टुथपेस्ट आदी साहित्य देण्यात आले. अनेक संस्थांनी जीवनावश्यक साहित्य दिले. मंगरूळच्या सरपंच रेखा ढोमसे यांनी गुरुद्वारा समितीला गहू सुपुर्द केला.
-----------
चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील निवारागृहात आमची जेवण, नास्ता, चहा व राहण्याची व्यवस्था अगदी घरच्यासारखी झाली. त्यामुळे आम्हाला घर अथवा पळून जाण्याची आठवणच आली नाही. आम्ही पुणे येथे मजुरी करुन काम करीत होतो. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी चांगली व्यवस्था ठेवली.- रामरूप कन्नोजिया, ता. भानपूर, जि. बस्ती, उत्तर प्रदेश
--------------------
चांदवड तालुक्यातील रेणुका इव्हेंट हॉल येथे आमच्या राहण्याबरोबरच आम्हाला साबण, पेस्ट व जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने महाराष्टÑातील जनता धन्यवादास पात्र आहे. आम्ही सूतारकाम, पीओपी रंग काम करणारे असून, गावी जात होतो.
- राजेंद्र कुमार यादव
भाननपूर जि. बस्ती, उत्तर प्रदेश