चिमण्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:12 AM2018-03-22T00:12:13+5:302018-03-22T00:12:13+5:30
एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.
नायगाव : एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील प्राथमिक शाळेत चिमणी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणातील झाडांच्या फांद्यांवर पाण्याने भरलेली गाडगी दोरीच्या साह्याने अडकवून व छोट्याशा तबकड्यांमध्ये विविध प्रकारचे धान्य व इतर खाद्य ठेवून पक्ष्यांना दाणापाण्याची सोय केली आहे. दरम्यान, शिक्षक आर. बी. वाकचौरे यांनी जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या आवारात पक्ष्यांसाठी केलेली पाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तीन-तीन विद्यार्थ्यांची तुकडी तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जबाबदारी विभागून दिली. मुख्याध्यापक मीनाक्षी वाघमारे यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराच्या अंगणातही पक्ष्यांच्या दाणापाण्याची, निवाऱ्याची व्यवस्था करून पक्षी संवर्धनात हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.
पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण व वाढणाºया सीमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चिमणी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्मशानातील छोटी छोटी गाडगी आणून त्यात पाणी भरून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. शाळेत असेपर्यंत रोज पक्ष्यांची दाणापाण्याची सोय करून देण्याची शपथ घेतली.
गेल्या काही दिवसांपासून शाळेत नवनव्या संकल्पना राबविल्या जात आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला एलईडी देऊन ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात यश आहे.
- नलिनी गिते, सरपंच