आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था
By admin | Published: January 23, 2015 02:02 AM2015-01-23T02:02:48+5:302015-01-23T02:02:48+5:30
आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था
नाशिक : भारताच्या प्राचीन वेदात असलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेला देशात आणि जगभरात पोहोचविण्यासाठी केंद्रशासन प्रयत्न करीत आहे. अॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पहिले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
पंचवटीतील आरोग्य सेवा संघाच्या आरोग्य शाळा रुग्णालयाच्या वतीने पंचकर्म कक्षाचे उद््घाटन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, संघाचे अध्यक्ष मामासाहेब राजपाठक तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ऋषी-मुनी आणि वेदांत सांगितलेले आयुर्वेद ही आपली परंपरा आहे. परंतु परकियांनी आक्रमण करून अन्य परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तद्वतच स्वातंत्र्यानंतर या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता केंद्र सरकारने आपली परंपरा असलेले आयुर्वेद पुढे नेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे केंद्रात प्रथमच हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या विविध योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरीव तरतूद करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आयुर्वेदाच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगून नाईक यांनी आयुर्वेद आपल्या देशातील असतानादेखील विदेशी लोक त्याचे महत्त्व सांगतात. नाकर्तेपणामुळे उगम असलेल्या देशातच आयुर्वेदाचे महत्त्व कमी झाले आहे. आयुर्वेद टिकवून ठेवण्यासाठी देशातच आयुर्वेदाचे महत्त्व वाढले पाहिजे. अॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी केंद्र, राज्य आणि ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वरोगोपचार मिळू शकेल तसेच औषध निर्मितीतून गरिबांना परवडणारी उपचार व्यवस्था निर्माण होऊ शकेल, असेही नाईक म्हणाले.