नांदूरशिंगोटेत स्थलांतरित ५५ जणांची निवारागृहात व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:01 PM2020-04-02T17:01:17+5:302020-04-02T17:01:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक बांधकाम, दुकाने आणि कारखाने बंद पडले आहेत. यामुळे परप्रांतीय व परजिल्ह्यातील कामगार स्थलांतरित होताना दिसत आहेत. बस, खासगी वाहने आणि रेल्वे बंद असल्याने शेकडो कामगार रस्त्याने कुटुंबासह महिला व अबालवृद्धांना घेऊन जाताना दिसत आहेत. तहसीलदार राहुल कोताडे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांनी जागेची पाहणी करून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांनी या ठिकाणी शिधा पोहोच
केला आहे. कामगारांनी या ठिकाणी थांबण्याचे आवाहन तहसीलदार कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत लांडगे यांनी केले आहे. दरम्यान, गुरु वारी दुपारी दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी निवारागृहात असणार्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली.
विभागीय आयुक्तांकडून तपासणी
नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी व निवारागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री अचानक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांनी नाशिकपासून अहमदनगर जिल्ह्यातील बोटा हद्दीपर्यंत असणार्या चेकपोस्टची तपासणी करून सूचना दिल्या. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत लोकांना मुलभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच नाशिक-पुणे, सिन्नर -शिर्डी व सिन्नर -घोटी मार्गावर पायी जाणार्या स्थलांतरित मजुरांना व कामगारांना या ठिकाणी थांबून आधार दिला जाणार आहे. या कामगारांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे, त्यांना आंघोळ, जेवण, स्वच्छता आणि तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिन्नर येथील एका मंगल कार्यालयात तर नांदूरशिंगोटे येथे पुणे महामार्गावर संदीप हॉटेलजवळ आणि वावी येथे शिर्डी महामार्गावर साई मनोहर सांस्कृतिक भवन येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.