बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या

By नामदेव भोर | Published: April 2, 2023 05:45 PM2023-04-02T17:45:56+5:302023-04-02T17:46:19+5:30

पोलिसांनी या गुन्ह्यात सातपूर येथील संशयित युवराज मोहन शिंदे (वय ३७) व देवीदास मोहन शिंदे (२६) या दोन भावांना अटक केली आहे.

arrest to two who robbed 66 lakhs cash at gunpoint | बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या

बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या

googlenewsNext

नाशिक : होलाराम कॉलनीतील आंबेडकर चौकात पाच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकास बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाख ५० हजारांच्या रोकडसह चारचाकी कार जबरदस्तीने चोरून नेत पाच महिन्यांपासून फरार संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सातपूर येथील संशयित युवराज मोहन शिंदे (वय ३७) व देवीदास मोहन शिंदे (२६) या दोन भावांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५३ लाखांच्या रोकडसह एक कार व मोबाइल हस्तगत केला आहे.

होलाराम कॉलनीत ज्येष्ठ नागरिक कन्हैयालाल तेजसदास मनवानी यांच्या कारचा चालक देवीदास मोहन शिंदे याने व कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार यांनी संगनमत करून फिर्यादी कन्हैयालाल मनवानी यांच्या छातीला रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीतील ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटून मनवानी यांच्याच कार (एमएच १५ जीएफ ९५६७) मधून पळ काढला होता. या प्रकरणात मनवानी यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख यांनी संशयित युवराज मोहन शिंदे व देवीदास मोहन शिंदे यांचा कोल्हापूर, पुणे, कात्रज येथे माग काढून शोध घेत असताना संशयित नाशकातच सातपूर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पथकाने सातपूर परिसरातून युवराज शिंदे व देवीदास शिंदे यांना एका कार व मोबाइलसह अटक केली असून, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले. दरम्यान, दोघांनाही रविवारी (दि. २) न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना बुधवार (दि. ५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी दोन्ही संशयितांकडून लुटीच्या गुन्ह्यातील ६६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी ५३ लाखांची रोकड हस्तगत केली असून, चार लाख रूपये किमतीची कार व ३० हजार रुपये किमतीचा एक मोबाइल फोन व एक हजार रुपयांची प्रवासी बॅग असा एकूण ५७ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

Web Title: arrest to two who robbed 66 lakhs cash at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.