फरार आरोपीला ११ महिन्यांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:00 AM2019-02-15T01:00:02+5:302019-02-15T01:01:06+5:30
म्हसरूळ बोरगड (एकतानगर) परिसरात राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खून प्रकरणात तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयिताला पंचवटी पोलीस ठाण्याच्या पुन्हा शोध पथकाने अकरा महिन्यांनी अटक केली आहे. प्रशांत अशोक जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पंचवटी : म्हसरूळ बोरगड (एकतानगर) परिसरात राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खून प्रकरणात तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयिताला पंचवटी पोलीस ठाण्याच्या पुन्हा शोध पथकाने अकरा महिन्यांनी अटक केली आहे. प्रशांत अशोक जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयित जाधव हा पेठरोडवरील मेहरधाम येथे राहत्या घरात असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हा शोध पथकाच्या पोलीस कर्मचाºयांनी जाधव याच्या घराजवळ सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या व म्हसरूळ पोलिसांच्या स्वाधीन केले. जाधव याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरगड येथील नितीन परदेशी याच्यावर गेल्यावर्षी ६ जूनला सतीआसरा मंदिराजवळ संशयित आरोपी विजयकुमार पुंडलिक गांगोडे, मयूर राजाभाऊ जाधव तसेच हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार व प्रशांत अशोक जाधव अशा चौघांनी आर्थिक वादातून परदेशीवर गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. संशयित मयूर जाधव याची चारचाकी परदेशी याने भुसावळला नेली होती त्यावेळी चारचाकीचा अपघात झाल्याने तसेच पोलीस ठाण्यात जमा असलेली गाडी सोडविण्यासाठी जाधव व परदेशी यांच्यात वाद निर्माण झाले होते व त्यातूनच परदेशी याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती तर जाधव हा फरार झालेला होता. त्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र जाधव वेगवेगळ्या जिल्ह्यात वास्तव्य करून पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. जाधव हा मेहरधाम येथील घरी असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर, हवालदार बाळा ठाकरे, सुरेश नरवडे, संदीप शेळके, संतोष काकड, महेश साळुंके, अरुण गायकवाड, विष्णू जाधव, उत्तम खरपडे आदींनी सापळा रचून अटक केली.
गुन्हेगारांचे कम बॅक
विविध गुन्ह्यांत सहभाग असलेले तर काही गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या संशयित आरोपींचा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावर वाढला आहे. कधी तडीपार प्रकरणात तर कधी मारहाण व अन्य गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात फरार असलेले गुन्हेगार कागदोपत्री फरार असले तरी ते चोरीछुप्या पद्धतीने राहत असलेल्या परिसरात येत असल्याने गुन्हेगारांचे पुन्हा कम बॅक होत असल्याचे बोलले जात आहे.