चारचाकी पळविणाऱ्या पोलीसपुत्रास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:20 AM2018-12-25T00:20:02+5:302018-12-25T00:20:15+5:30
दिंडोरीरोडला नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या युवकाला शस्त्राचा धाक दाखवून स्विफ्ट डिझायर ही चारचाकी जबरीने पळवून नेल्याप्रकरणी पोलीसपुत्रासह तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : दिंडोरीरोडला नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या युवकाला शस्त्राचा धाक दाखवून स्विफ्ट डिझायर ही चारचाकी जबरीने पळवून नेल्याप्रकरणी पोलीसपुत्रासह तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चोपडा येथे राहणाºया दिनेश माणिकलाल देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांच्या काकांचा मुलगा सागर चौधरी हे नाशिकला दिंडोरीरोड श्रीराम पार्क येथे राहणारे मामा रवींद्र पाटील यांना भेटण्यासाठी रविवारी (दि.२३) दुपारी स्विफ्ट कारने क्रमांक (एम.एच. १९ सीएफ १४३१) चोपडा येथून आले होते. संशयित आरोपी प्रवीण गणपत काकड व त्याचे दोन साथीदार असे तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरीने कार पळवून नेली.
कार चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित प्रवीण काकड हा पोलीसपुत्र आहे. काकड याच्यावर यापूर्वी म्हसरूळ तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काकडवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याला काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.
- सुनील रोहोकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ