बुटात लपवलेल्या चावीच्या आधारे घर साफ करणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 01:04 AM2022-05-04T01:04:15+5:302022-05-04T01:04:35+5:30
बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराबाहेरील बुटात ठेवलेली चावी सापडली आणि चोरट्यांनी सहजगत्या घर साफ केले. सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या चाेरीप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी करून त्यातील २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक- बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराबाहेरील बुटात ठेवलेली चावी सापडली आणि चोरट्यांनी सहजगत्या घर साफ केले. सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या चाेरीप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी करून त्यातील २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माडसांगवी येथे हा प्रकार घडला होता. विष्णू लक्ष्मण मुंढे हे कामानिमित्ताने १४ एप्रिल राेजी बाहेर गेले होतेे, ते परत आले तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचे आढळले होते. त्यांनी घराबाहेर ठेवलेल्या बुटात चावी ठेवली होती. ती सापडल्याने चोरट्यांना सहजगत्या घरात प्रवेश मिळाला आणि त्यांनी स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला हेाता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मंगेश संतोष कदम आणि वैभव अर्जुन बर्वे या दोघांना २७ एप्रिल रोजी अटक केली. या दोघांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली हेाती. या कालावधीत पोलिसांनी अधिक चौकशी करून १ लाख २४ हजार ६१० तसेच दागिने असा २ लाख ३८ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.