मूर्तिजापूर येथे अटक : पाच लाखांच्या खंडणीची मागणी
By admin | Published: October 2, 2016 12:50 AM2016-10-02T00:50:10+5:302016-10-02T00:57:26+5:30
विंचूर येथील ठेकेदाराच्या अपहृत बालकाची सुटका
विंचूर/नाशिक : ठेकेदाराकडे कामास असलेल्या परप्रांतीय मजुराने केलेल्या पैशांच्या अफरातफरीबाबत मालक पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळताच मजुराने ठेकेदाराच्या अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याची घटना निफाड तालुक्यातील विंचूर येथे घडली. विशेष म्हणजे या अपहरण प्रकरणाची तक्रार ठेकेदाराने शहर पोलिसांकडे करताच शहर पोलीस, तांत्रिक विश्लेषण विभाग, ग्रामीण पोलीस व रेल्वे पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून शनिवारी (दि़ १) पहाटे मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर या अपहृत बालकाची सुखरूप सुटका तर केलीच शिवाय या मजुराच्या मुसक्याही आवळल्या़
सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील विंचूर येथे शासकीय ठेकेदार शेख इसाक शेख इमाम राहतात़ त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील मालदा येथील संशयित जिया उल हक हा गत आठ वर्षांपासून कामास होता़ जुना कामगार असल्याने ठेकेदार शेख यांनी विश्वासाने त्याच्याकडे बिलांसह आर्थिक जबाबदारी सोपविली होती़ मात्र, गत काही दिवसांपासून तो बिलांमध्ये अफरातफर करून जास्तीची बिले लावून पैसे काढत असल्याचे शेख यांच्या लक्षात आले़ त्यांनी हे काम काढून घेतले व पोलिसांत तक्रार करण्याचीही धमकी दिल्याने या दोघांमध्ये वादही झाले होते़
ठेकेदार इसाक हे शुक्रवारी (दि़ ३०) कामानिमित्त मुंबईला गेले होते़ ही संधी साधून संशयित जिया उल हक हा दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी गेला व त्यांचा अडीच वर्षीय मुलगा शेख आफताब शेख इमाम यास फिरवून आणण्याचे बहाण्याने घेऊन गेला़ त्यांच्या पत्नीस या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती नव्हती, तसेच तीन-चार तास होऊनही आफताब व जिया घरी न आल्याने त्यांनी जियाच्या घरी जाऊन पाहिले असता तो सामानासह गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पतीशी संपर्क करून घटनेची माहिती दिली़ या प्रकारानंतर घाबरलेले इसाक यांनी जियाला फोन केला असता त्याने आपल्या बॅँक खात्यामध्ये पाच लाख रुपये टाकण्यास सांगितले, पैसे न टाकल्यास आफताबला ठार मारण्याची धमकीही दिली़
मुंबईहून नाशिकला रात्री १० वाजेच्या सुमारास येताच इसाक यांनी तडक सरकारवाडा पोलीस ठाणे गाठूननिरीक्षक कोल्हे यांच्याकडे तक्रार केली़ कोल्हे यांनी शहर-ग्रामीण असा भेदभाव न करता तत्परतेने सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, लासलगावचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना माहिती देऊन कामास सुरुवात केली़ सायबर शाखेकडून जियाचे मोबाइल लोकेशन घेतल्यानंतर तो अपहृत बालक आफताब यास घेऊन रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समोर आले़ रेल्वे पोलिसांनाही या कामगिरीमध्ये समाविष्ट करून घेतले व अखेर शनिवारी (दि़ १) पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर जियाला अटक करून आफताबची सुखरूप सुटका करण्यात आली़ त्याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.