गणरायाचे भक्तीभावात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:52+5:302021-09-11T04:15:52+5:30
सिन्नर / मालेगाव : जिल्ह्यात ठिकठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात आगमन झाले. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक ...
सिन्नर / मालेगाव : जिल्ह्यात ठिकठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात आगमन झाले. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोरोनाचे विघ्न असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा मैदानावर दुपारपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मंडप नसल्याचे चित्र होते.
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी श्रींच्या मूर्तीच्या स्थापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत अबालवृद्धांनी वस्त्राचे अच्छादन टाकून घरी गणेशाची मूर्ती आणली. मनोभावे पूजन करुन गोड नैवद्य व मोदकाचे प्रसाद ठेवून गणेशाची स्थापना करण्यात आली. प्रत्येक घरात बालकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
गणेश स्थापनेच्या दिवशी दरवर्षी दिसणारी सार्वजनिक मंडळाची लगबग आणि ढोलताशांचा आवाज यावर्षी दिसून आला नाही. वाजंत्री व ढोल ताशा नसल्याने वातावरण शांत आणि सुनेसुने वाटत होते. तथापि, घरगुती गणेश स्थापनेसाठी अबालवृद्धांमध्ये चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण होते. यावर्षी चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीवर मर्यादा असल्याने मूर्तीचा आकार काहीसा लहान दिसत होता. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पदाधिकाऱ्यांची घरी, सभामंडपात किंवा मंदिरात छोट्याशा मूर्तीची मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थितीत स्थापना करुन आपली दरवर्षी गणेशमूर्ती बसविण्याची परंपरा खंडित होऊ दिली नाही. मात्र मिरवणुकीवर बंदी असल्याने गर्दी अथवा ढोलताशांचा गजर दिसून आला नाही.
दरवर्षी सिन्नर, वावी आणि एमआयडीसी या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या जास्त होती. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर अनेक नियम आणि मर्यादा आल्या आहेत. याशिवाय मिरवणुकीला परवानगी नसल्याने कार्यकर्ते हिरमुसले आहेत.
सकाळपासून सरस्वती पूल, गणेशपेठ, गावठा या भागात पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्ती विक्रीसाठी लावण्यात आल्या होत्या. घरगुती गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य घेण्यासाठी लोकांनी सकाळी थोड्याफार प्रमाणात गर्दी केली होती. कोणतेही वाद्य न वाजवता भाविक घरगुती गणेशमूर्ती घेऊन जात होते. दुपारपर्यंत अनेकांनी घरगुती गणपतीची मनोभावे पूजाअर्चा करुन स्थापना केली होती.
--------------------------------
गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरु नये, यासाठी अनेकदा प्रबोधन केले जाते. मात्र त्यानंतरही आकर्षक आणि चांगले रंगकाम असलेल्या सुबक मूर्तींकडे भाविकांचा ओढा दिसून येतो. शाडू मातींसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या किमती दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेल्या दिसून आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या आकाराच्या मूर्ती विक्रीसाठी दिसत नव्हता. मात्र कोरोनाच्या सावटामुळे घरगुती गणेशमूर्तींची ही संख्या कमी प्रमाणात दिसून आली. त्यामुळे मूर्तींचे भाव काहीसे वाढलेले दिसून आले.
---------------
सिन्नर येथे बाजारपेठेत कोणत्याही वाद्यविना घरगुती गणेशमूर्ती भक्तीभावाने घेऊन जातांना भाविक. (१० सिन्नर गणेश)
100921\10nsk_5_10092021_13.jpg
१० सिन्नर गणेश