शहरातील बाजारात द्राक्षांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:53+5:302021-02-06T04:23:53+5:30
नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच ...
नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांचे आगमन झाले असून द्राक्षांना मागणी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांनाही हा हंगाम अधिक उत्पन्न मिळवून देण्याची अपेक्षा आहे. सध्या बाजारात द्राक्षाला प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. मात्र, थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील काळात वाढत्या उष्णतेसोबतच द्राक्षांच्या साखरेत आणि भावातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्हे द्राक्ष उत्पादनाचे मुख्य जिल्हे आहेत. त्यातही नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची सर्वाधिक निर्यात युरोपियन देशांमध्ये होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिपावसाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला होता. तर २०२० मध्ये अवकाळी पावसाचा द्राक्षांना फटका बसला होता. अशा कठिण परिस्थितीचा सामना केल्यानंतर यावर्षी द्राक्षांना युरोपसह विदेशात चांगली मागणी असताना स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांना चांगला दर मिळत आहे. सध्या बाजारपेठेत प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत निर्यातीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांचे भाव वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत साखरभरणी होऊन निर्यातीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे पुढील काळात द्राक्षांना चांगले दर मिळण्याची आशा आहे.
-मदन पिंगळे , द्राक्ष उत्पादक शेतकरी
इन्फो -
आरोग्यासाठी द्राक्षे फायदेशीर
द्राक्षे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर असून ते शरीराला बर्याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते.
(फोटो- ०२पीएचएफबी८४, ८५, ८६)