संत निवृत्तीनाथ पालखीचे स्वगृही आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 07:17 PM2018-08-13T19:17:10+5:302018-08-13T19:18:13+5:30
वरुणराजाचा अभिषेक : त्र्यंबकेश्वरी जोरदार स्वागत
त्र्यंबकेश्वर : तब्बल ५० दिवसांचा पायी प्रवास करत पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेऊन परतलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवारी (दि.१३) स्वगृही परतली. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात भावभक्तीमय वातावरणात पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचवेळी वरुणराजानेही पालखीवर अभिषेक घातला.
त्र्यंबकेश्वर मध्ये पालखीचा प्रवेश होताच संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी विश्वस्तांसह निवृत्तीनाथांची पालखी विराजमान असलेल्या रथाचे पूजन केले. याचवेळी वारकऱ्यांचेही हार फुले देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांसह गावक-यांनी गर्दी केली होती. गावातील नागरिकांनी रांगोळ्या काढत काही ठिकाणी पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. त्र्यंबक राजाच्या मंदिरात नाथांची पालखी नेण्यात आली त्यानंतर कुशावर्तात स्नान घातल्यावर समाधी मंदिराकडे पालखी मार्गस्थ झाली. यावेळी सचिव पवन भुतडा. त्र्यंबकराव गायकवाड, जयंत महाराज गोसावी, पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, पंडित महाराज कोल्हे, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे आदीं सह कीर्तनकार सहभागी झाले होते.
पालिकेला शिष्टाचाराचा विसर !
गत वर्षी तत्कालीन नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी संत निवृत्तीनाथ पालखीचे शहरात आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. मात्र यावर्षी नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना पालखी स्वागताच्या पूजनाचा विसर पडल्याचे दिसून आले. पालिकेला स्वागताच्या शिष्टाचाराचा विसर पडल्याने वारक-यांनी नाराजी व्यक्त केली.