३२१ नाशिककरांचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:29 AM2021-12-05T01:29:26+5:302021-12-05T01:29:51+5:30
साहित्य संमेलनात नाशिकच्या सुमारे ३२१ कलावंतांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत प्रातिनिधिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित सादर केलेल्या ‘आनंद यात्रे’ने उपस्थिताची मने जिंकली. कथा, कविता, वैविध्यपूर्ण नृत्याविष्काराने हा सांस्कृतिक सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला.
नाशिक : साहित्य संमेलनात नाशिकच्या सुमारे ३२१ कलावंतांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत प्रातिनिधिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित
सादर केलेल्या ‘आनंद यात्रे’ने उपस्थिताची मने जिंकली. कथा, कविता, वैविध्यपूर्ण नृत्याविष्काराने हा सांस्कृतिक सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला.
कुसुमाग्रज नगरीतील मुख्य मंडपात पार पडलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ कवी गोविंद यांच्या ‘नमने वाहुनि स्तवने उधळा’ या काव्याने झाली. यानंतर आलेल्या साहित्याच्या दिंडीने सोहळ्याची उंची वाढविली. प्राजक्त देशमुख लिखित, सचिन शिंदे व विनोद राठोड सहदिग्दर्शित सांस्कृतिक सोहळ्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कलावंत सहभागी झाले होते. ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी, स्वा. वि.दा. सावरकर, लक्ष्मीबाई टिळक, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, बालकवी, साने गुरुजी, बा. सी. मर्ढेकर, वामनदादा कर्डक, शाहीर परशराम, सोपानदेव चौधरी, मुरलीधर खैरनार, बी. डी. जाधव, किशोर पाठक, अरुण काळे यासह विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित हा सांस्कृतिक सोहळा उत्तरोत्तर रंगला. यावेळी दादासाहेब फाळके यांच्यापासून ते राजीव पाटील यांचा प्रवास चित्रफित आणि नृत्यातून उलगडून दाखविण्यात आला. यावेळी निवेदन जयंत ठोंबरे भूषण मठकरी, राजेंद्र उगले आदींने केले.
-