साहित्यनिर्मिती ही कला
By admin | Published: June 29, 2015 01:43 AM2015-06-29T01:43:00+5:302015-06-29T01:43:43+5:30
साहित्यनिर्मिती ही कला
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव घेऊन प्रत्येकाने आपापली भूमिका पुढे दामटल्याने आंबेडकरी साहित्याला कुंठितावस्था निर्माण झाली असून, सर्जनशील साहित्य कोणत्याही ‘वादा’त बांधले जाऊ नये. साहित्यनिर्मिती ही कला आहे. कलेला निकष आले की अवरोध निर्माण होतो. आंबेडकरी साहित्य हे सर्वसमावेशक असावे, असा सूर चर्चासत्रात निघाला.
डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाच्या वतीने ‘साहित्यलेखनाच्या कुंठितावस्थेची कारणमीमांसा व त्यावरील उपाय’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी बीजभाषण केले. प्रा. जयदेव डोळे, प्रा. अविनाश डोळस, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सत्येश्वर मोरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. संजय मून, डॉ. अरुणा लोखंडे, प्रा. उत्तम अंभोरे, मोतीराम कटारे, डॉ. वामन गवई, कमलाकर पायस, देवेंद्र उबाळे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. साहित्याचा उगम सामाजिक चळवळीतून झाला. सामाजिक चळवळ कुंठित झाल्याचा परिणाम साहित्यावर झाला. त्यामुळे सामाजिक चळवळीसाठी लेखकांनी स्वतंत्र वेळ द्यायला हवा, असे मत डॉ. मुलाटे यांनी व्यक्त केले. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वत:ची माध्यमे निर्माण करण्याऐवजी प्रस्थापित मूल्यवादक संस्था, माध्यमांमध्ये आपले स्थान निर्माण करायला हवे. तशी पात्रता तयार करायला हवी. सर्जनशील साहित्याची निर्मिती करताना त्याला कडेकोट चौकट असता कामा नये. आंबेडकरवादाचे वैयक्तिकीकरण न करता तो सर्वसमावेशक ठेवावा, असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी केले. डॉ. संजय मून यांनी सध्या धम्म चळवळीचे धर्मात रूपांतर न होऊ देण्याचे आव्हान धम्मापुढे उभे असल्याचे सांगितले. मानवतेच्या प्रवासाला निघालेले दलित साहित्य मध्येच अडकून पडल्याचेही ते म्हणाले, तर दलित साहित्यात बदलाची प्रक्रियाच होऊ शकली नसल्याबद्दल प्रा. अविनाश डोळस यांनी खंत व्यक्त केली. दलित साहित्यिकांनी विरोधी भूमिका ऐकून घेऊन, संवाद-चर्चेद्वारे ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. वामन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह गंगाधर अहिरे, जयवंत खडताळे, प्रमोद अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)