वन्य जीवांच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:35 PM2019-05-19T18:35:57+5:302019-05-19T18:36:37+5:30
सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. परिणामी पशू-पक्ष्यांची भटकंती होत आहे. हे पाहून वनविभागाकडून चार गावांत २० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्यप्राण्यांच्या पाणी सुविधेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे.
गत पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यातील पाटोळे, खोपडी, मिठसागरे, वावी येथे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दहा प्लॅस्टिक ड्रम कापून त्याचे पाणवठे तयार करण्यात येऊन वन्यप्राण्यांचा राबता असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना या सुविधेचा लाभ होतानाचे चित्र आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था करण्यात आली. डिसेंबर महिन्यापासून जंगलातील पाणीसाठे कमी पडू लागले होते. मार्च महिन्यात बहुतांश गावांतील पाणीसाठा कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांनी वस्त्यांकडे धाव घेतली. पाण्याच्या शोधार्थ भटकणाºया वन्यप्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे प्रस्ताव वनविभागाने पाठवले होते. त्यास मंजुरी मिळून २० ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. बिबटे, मोर, ससे, तरस, काळवीट, कोल्हे, लांडगे हे वन्यप्राणी तालुक्यात आढळतात. पाटोळे, मिठसागरे, वावी, खोपडी या गावांत वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाणवठ्यांतील पाणी संपुष्टात आल्याने व वाड्या-वस्त्यांवरही नागरी वस्तीत पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा केली आहे. वन्यप्रेमींकडून या सुविधेचे स्वागत केले जात आहे.