दिव्यांगांना मिळाले कृत्रिम अवयव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:06 AM2019-09-23T00:06:45+5:302019-09-23T00:07:14+5:30
सालाबादप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे १०० गरजूंना कृत्रिम अवयवांचा मोफत लाभ देण्यात आला. तसेच सुमारे एक हजार नागरिकांची मोफत वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली.
नाशिक : सालाबादप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे १०० गरजूंना कृत्रिम अवयवांचा मोफत लाभ देण्यात आला. तसेच सुमारे एक हजार नागरिकांची मोफत वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली.
जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघाच्या वतीने उपप्रवर्तक पंडितरत्न प्रमोदमुनिजी म. सा., डॉ. समकितमुनिजी म.सा., यांच्या सानिध्यात रविवारी (दि.२२) चोपडा बँक्वेट सभागृहात मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण व महाआरोग्य निदान शिबिर युवा मंचाकडून घेण्यात आले. या शिबिरासाठी तीन दिवसांपूर्वी १०० दिव्यांगांनी मंचाकडे नोंदणी केली होती. या गरजूंना कृत्रिम पाय आणि हात या अवयवांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती मंचाचे सचिव चेतन भंडारी यांनी दिली. तसेच यावेळी महाआरोग्य शिबिरात सुमारे एक हजारांहून अधिक नागरिकांची नेत्र, दंत चिकित्सेसोबत शारीरिक वैद्यकीय तपासणी शहरातील विविध रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून करण्यात आली.
यामध्ये डॉ. प्रणील लोढा, डॉ. सारिका परतानी, डॉ. शरद परतानी, योगेश कोठारी यांनी सहभाग घेतला. तसेच युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. अर्पण रक्तपेढीच्या वतीने २०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंचाचे अध्यक्ष तन्मय हिरण, प्रभा मुंदडा, अमित बोरा, निकिता कोठारी, पीयूष बागमार आदींनी प्रयत्न केले.
आठ वर्षांपासून उपक्रम
मारवाडी युवा मंचाकडून २०११ सालापासून मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत १२०० गरजू दिव्यांगांपर्यंत कृत्रिम अवयव पोहोचविण्यास मंचाला यश आल्याचे चेतन भंडारी यांनी सांगितले. यंदाचे शिबिराचे आठवे वर्ष होते. सामाजिक भावनेतून दरवर्षी शिबिर राबवून गरजू दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे प्रत्यारोपण करून दिले जाते, असे ते म्हणाले.