पांगरी येथे पाइपलाइन फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:29 AM2018-03-30T00:29:02+5:302018-03-30T00:29:02+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदी-पात्रात आहे. तेथून जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. येथे रयत शिक्षण संस्थेच्या संत हरिबाबा विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. इमारतीसाठी पाया खोदत असताना पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. जलवाहिनी फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर जलवाहिनी बऱ्याच वर्षांपूर्वीची व सिमेंट पाइप असल्याने त्या साइजचा पाइप मिळणे अवघड झाले आहे. तसेच आता या जागेवर इमारत बांधकाम होणार असून, भविष्यात गळती झाल्यास गळती काढणे अवघड जाणार असल्याने ग्रामपंचायतीने जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजून दोन दिवस पांगरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनीचे तातडीने स्थलांतर करून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी प्रकाश पांगारकर, सुनील निरगुडे, युनुस कादरी, सुनील पेखळे, राजू निखाडे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.भविष्यात जलवाहिनी फुटू नये त्याकरिता मोकळ्या जागेवरून जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच काम पूर्ण होऊन लवकरात लवकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- ज्ञानेश्वर पांगारकर,
सरपंच, पांगरी
------------------------
सुमारे ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने त्याचे साहित्य मिळणे अवघड झाल्याने नवीन चार इंच व सहा केजी जलवाहिनी टाकत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- पी. आर. बोरसे, ग्रामविकास अधिकारी, पांगरी.