कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

By admin | Published: September 17, 2015 10:41 PM2015-09-17T22:41:49+5:302015-09-17T22:49:21+5:30

पाच गाव पाणीपुरवठा योजना बंद

Artificial water shortage: Electricity discontinued due to electricity bills | कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे तीन महिन्यांपासून वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा समितीने तत्काळ उपाययोजना करून पाणी योजना सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे गावाला नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा समितीस अनेकदा वीजबिल भरण्यासंदर्भात तगादा लावल्यानंतरही प्रशासन व समितीकडून वीजबिल न भरल्याने नाइलाजास्तव वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजते. कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रूक आणि मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावांना दर महिन्याचे पाणीपट्टीही ठरवून देण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पाचही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीपुरवठा समिती, प्रशासन, पाचही गावांचे पदाधिकारी यांच्यात नेहमीच समन्वय नसल्याने पाणीपुरवठा योजना विस्कळीत असते. मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द या दोन गावांना वेळेवर पाणी जात नाही. तसेच पाणीयोजना सुरळीत राहण्यासाठी पंचायत समिती सभागृहात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या आहेत. परंतु याबाबत योग्य तोडगा अद्यापही निघाला नसल्याने पाणी योजना सुरळीत झाली नाही. महिन्याकाठी योजनेला सव्वा लाखाच्या आसपास देखभाल, दुरुस्ती व वीजबिलाचा खर्च येत आहे. परंतु, नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता उर्वरित गावांकडून पाहिजे त्या प्रमाणात पाणीपट्टी वसुलीची रक्कम दिली जात नसल्याने योजना चालविताना कसरत करावी लागत आहे. भोजापूर धरणात पाणी असतानाही पाचही गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
बैठकीत ठरल्याप्रमाणे मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतींचे ३५ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे सचिव जालिंदर वाडगे यांनी दिली. उर्वरित गावांनी पैसे दिले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
वीज वितरण कंपनीने वारंवार नोटीस पाठवून वीजबिल भरण्यास सांगितले होते. याबाबत समितीकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने वीज वितरण कंपनीने मंगळवारी (दि. १५) वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन दिवसांपासून योजना बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे.
पाणी पिण्यासाठी राखीव
सिन्नर : टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी दिली.
टंचाईमुळे राज्यातील सर्व पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तालुक्यात सलग पाचव्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अद्याप एकही धरण भरले नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. त्यामुळे ज्या धरणांमधून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे त्या धरणांवर महसूल विभागाचे जास्त लक्ष असणार आहे.
भोजापूर, सरदवाडी, उंबरदरी, कोनांबे यांच्यासह तालुक्यातील छोट्या-मोठ्या धरणातून शेतीसाठी पाणी उचल तत्काळ बंद करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी केले आहे. भूजल अधिनियमातील तरतुदी अन्वये पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून शेतीसाठी पाणी घेण्यावर निर्बंध लावण्यात येणार असून, पाण्याची चोरी करण्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार खैरनार यांनी दिली. या मोहिमेत पाटबंधारे विभाग, पोलीस, वीज वितरण कंपनी व महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाई पथक असणार असल्याचे डॉ. मंगरुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही धरणातून शेतीसाठी पाणीउपसा
करू नये अन्यथा कायदेशीर
कारवाई करण्याचा इशारा डॉ. मंगरूळे व खैरनार यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Artificial water shortage: Electricity discontinued due to electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.