तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 02:50 PM2021-03-18T14:50:25+5:302021-03-18T14:56:59+5:30
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले.
नाशिक: भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून 274 प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करत 'तोपची' म्हणून स्वत:ला सिध्द करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला
सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८साली करण्यात आली. देशातील सर्वात मोठे तोफखाना प्रशिक्षण केंद्र असल्याचा गौरव या केंद्राला प्राप्त आहे. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवसैनिक तोफा चालविण्याचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण घेत भारतीय सेनेत या केंद्राच्या उमराव मैदानातून दाखल होतात. गुरुवारी कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या नवसैनिकांच्या शपथविधी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर जे.एस.गोराया उपस्थित होते. त्यांनी मैदानावरील संचलनाचे बारकाईने निरिक्षण करत उपस्थित नवसैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुरुमंत्र देत शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच गुरुवारीसुध्दा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पहावयास मिळाले. संचलनात सहभागी झालेल्या २७० जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखल्याचे दिसून आले. सैनिकी शिस्तीचे दर्शन यावेळी घडले.
शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून नारायण शिंदे या नवसैनिकाला गौरविण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या 'कदम-कदम बढायें जा...' आणि 'शेर ए-जवँ'च्या धूनने प्रशिक्षणार्थींच्या संचलनामध्ये उत्साह संचारला होता.