आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 03:27 PM2021-09-29T15:27:15+5:302021-09-29T15:31:09+5:30
नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते.
नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या तोफखाना केंद्रातून ४२ आठवड्यांचे खडतर शास्त्रशुध्द प्रशिक्षण पुर्ण करत ५५० नवसैनिकांनी विविवध तोफांच्या साक्षीने बुधवारी (दि.२९) देशसेवेची शपथ घेतली. प्रशिक्षणार्थी नवसैनिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राच्या उमराव मैदानावर पार पडला. नवसैनिकांच्या तुकडीने केलेल्या संचलनाने लक्ष वेधून घेतले.
भारतीय सेनेचे नाशिकरोड येथे सर्वात जुने आणि मोठे असे भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून दरवर्षी निवड प्रक्रियेतून आलेल्या सुमारे साडेपाच हजार तरुणांना नवसैनिक म्हणून घडविले जाते. वरुणराजाच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धूनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी खुल्या जिप्सी वाहनातून मैदानावरील संचलनाची पाहणी केली. दरम्यान, यावेळी प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या काही नवसैनिकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट नवसैनिक म्हणून कृष्णा कुमार यादव या जवानाला सन्मानित केले गेले.
४२आठवडे आपल्या मुलाला आपल्यापासून लांब ठेवल्यानंतर सैनिकाच्या वर्दीमध्ये त्याची रुबाबदार छबी दीक्षांत सोहळ्यात अनुभवण्यासाठी आतुर असलेल्या माता-पित्यांसह पालकांना यावेळी उपस्थित राहता आले नाही.