तोफखाना केंद्र : २७०नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 02:30 PM2021-08-28T14:30:23+5:302021-08-28T14:35:06+5:30
कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे 'गौरव पदक'देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपुर्द केले गेले.
नाशिक: भारतीय सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करत उज्ज्वल भवितव्य घडविण्याच्या तरुणांच्या स्वप्नांना सातत्याने नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राकडून बळ दिले जात आहे. एका सर्वसामान्य तरुण ४२ आठवड्यांचे शास्त्रोक्त खडतर सैनिकी प्रशिक्षणानंतर उत्तम नवसैनिक म्हणून या केंद्रातून घडलेला पहावयास मिळतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या २७०नवसैनिकांच्या तुकडीने शनिवारी (दि.२८) येथील 'उमराव' मैदानावरुन दिमाखदार सोहळ्याद्वारे भारतीय सैन्यदलात प्रवेश केला.
भारतीय सेनेचे नाशिकरोड येथे सर्वात जुने आणि मोठे असे भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात दरवर्षी निवडप्रक्रियेतून आलेल्या सुमारे साडेपाच हजार तरुणांना नवसैनिक म्हणून घडविले जाते. कोरोना काळातसुद्धा सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कठोर पालन करत नवसैनिकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य अखंडितपणे सुरु आहे.
शनिवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धूनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ह्यसॅल्यूटह्ण केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवळालीच्या स्कुल ऑफ आर्टीलरीचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल अजय सूद उपस्थित होते. तसेच केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर ए.रागेश यांनी सूद यांचे स्वागत केले. या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी खुल्या जिप्सी वाहनातून मैदानावरील संचलनाची पाहणी केली. यावेळी नवसैनिकांनी राष्ट्रध्वज व विविध तोफांच्या साक्षीने आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. दरम्यान, यावेळी प्रशिक्षण कालवधीत उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या काही नवसैनिकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलु कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट नवसैनिक म्हणून निखिल शर्मा या जवानाला सन्मानित केले गेले.