तोफखाना केंद्राचा शपथविधी : ३०२ नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:08 PM2021-02-13T14:08:56+5:302021-02-13T14:11:41+5:30
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले.
नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथून सुमारे ३०२ नवसैनिक (तोपची) भारतीय सैन्यदलात दाखल झाले. शनिवारी (दि.१३) कोरोनाच्या सावटाखाली येथील उमराव मैदानावर दिमाखदार दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नवसैनिकांच्या तुकडीने शानदार संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला.
भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या सामान्य कुटुंबातील युवक ४२ आठवड्यांपुर्वी नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाले. अत्यंत खडतर अशा लष्करी प्रशिक्षणाने या युवकांना एक परिपुर्ण सैनिकाच्या रुपात घडविले. या नवसैनिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या अशा तोफखाना प्रशिक्षण केंद्रात सर्व प्रकारचे धडे गिरवून स्वत:ला देशसेवेसाठी सज्ज केले. केंद्रातील उमराव मैदानावर या तुकडीचा शानदार लष्करी थाटात दीक्षांत सोहळा पार पडला.
यावेळी तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांनी परेड संचलनाचे निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला. शपथविधीसाठी होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून शंकाथली गोपिनाथ यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, यावेळी नवसैनिकांच्या माता-पित्यांना यावेळी ब्रिगेडियर गोराया यांच्या हस्ते गौरव पदक समारंभपूर्वक सन्मानाने प्रदान करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनने लक्ष वेधून घेत सोहळ्याचे आकर्षण वाढविले. दरवर्षी या तोफखान्यातून शेकडो नवसैनिक ह्यतोपचीह्णच्या भूमिकेत भारतीय सैन्यदलात दाखल होतात.नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय सेनेची परंपरा राखा; सैनिकी धर्म पाळा
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले. नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवसैनिकांनी नेहमीच ह्यसैनिकह्ण धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले.