आराईच्या शेतकऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:56 PM2018-09-18T17:56:23+5:302018-09-18T17:57:04+5:30
बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून आराई येथील शेतकरी दिलीप लोटन अहिरे (५६) यांचा सोमवारी मध्यरात्री स्वाइन फ्लूने नाशिक येथील एका खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
स्वाइन फ्लूच्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने बाधित रु ग्ण भरती झाले नसले तरी सटाणा ,नामपूर येथील खासगी रु ग्णालयांमध्ये बाधित रु ग्णांची संख्या वीस पेक्षा अधिक असून त्याला काही डॉक्टरांनी दुजोरा देखील दिला आहे. आराई येथील रहिवाशी बागलाण तलाठी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अहिरे यांचे थोरले बंधू दिलीप अहिरे यांना चार दिवसांपूर्वी ताप व श्वसनाचा त्रास होत होता. उपचारासाठी त्यांना सटाणा येथील एका खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात भरती करण्यात आले . त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी रात्री उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ ,पत्नी , मुलगा , मुलगी व सून असा परिवार आहे. दरम्यान स्वाइन फ्लूची लागण आटोक्यात आणण्यासाठी सटाणा शहराबरोबरच गावागावातील डुकरांचा पालिका व ग्रामपंचायतींनी तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ही आहेत आजाराची लक्षणे...
थंडी, ताप शंभर अंश, जास्त सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा सुजणे, खवखवणे, दुखणे, मळमळ, उलटी, जुलाब व पोटदुखी या लक्षणांचा समावेश या आजारात असतो.