अडीच वर्षात बदलले तब्बल १८ ग्रामसेवक, दीड कोटींची कामे ठप्प

By धनंजय रिसोडकर | Published: March 4, 2023 11:34 PM2023-03-04T23:34:54+5:302023-03-04T23:35:59+5:30

पिंपळगाव मोर हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव.

As many as 18 gram sevaks have changed in two and a half years, works worth one and a half crores have come to a standstill | अडीच वर्षात बदलले तब्बल १८ ग्रामसेवक, दीड कोटींची कामे ठप्प

अडीच वर्षात बदलले तब्बल १८ ग्रामसेवक, दीड कोटींची कामे ठप्प

googlenewsNext

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर या गावात सन २०२० च्या ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रामसेवकाने आजारपणाचे कारण देत रजा मागितल्याने तिथे २६ ऑगस्टला अन्य ग्रामसेवकाला या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत एकही ग्रामसेवक या गावात काम करण्यास इच्छुक नसल्याने प्रत्येक ग्रामसेवकाने थोडे दिवस आदेशाचे पालन करून वेगवेगळी कारणे देऊन तिथून काढता पाय घेतला. त्यामुळे गत अडीच वर्षात तब्बल १८ ग्रामसेवक बदलले गेल्याने बँकांच्या खात्यातही सरपंच आणि ग्रामसेवकांचा ताळमेळच न बसल्याने तब्बल दीड कोटी रुपयांची विकासकामे गावात ठप्प झाली आहेत.

पिंपळगाव मोर हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक अजबराव निकम या ग्रामसेवकाने २०२० च्या ऑगस्ट महिन्यात आजारपणाचे कारण देत ३८ दिवसांची रजा मागितली. तेव्हापासून सातत्याने अतिरिक्त पदभार देण्याचा अजब खेळ जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि इगतपुरी गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरू झाला, तो अजूपर्यंत सुरूच आहे. गतिमान प्रशासनाच्या नावाखाली ग्रामीण भागात प्रशासनाच्या खऱ्या स्वरूपाचा प्रत्यय येतो. आतापर्यंत वेळोवेळी १८ ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याची किमया प्रशासनाने करून दाखवली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीला १४ व पंधरावा वित्त आयोगाचा अडीच वर्षांपासून प्राप्त झालेला दीड कोटींचा निधी पडून असून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

गावातील अंतर्गत राजकीय कलहाला बळी पडून गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातत्याने प्रभारी ग्रामसेवकांकडील पदभार काढण्याची भूमिका घेतल्यामुळेच सातत्याने ग्रामसेवकांकडील पदभार काढण्यात आल्याची चर्चा त्यामुळे रंगली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनीही प्रत्येक वेळी ग्रामसेवकांची विनंती मान्य करून इगतपुरी तालुक्यातील दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास अतिरिक्त प्रभार देण्याची भूमिका घेतली.

Web Title: As many as 18 gram sevaks have changed in two and a half years, works worth one and a half crores have come to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक