नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्ये डेंग्यूचे तब्बल २३२ रुग्ण
By Suyog.joshi | Published: November 29, 2023 07:14 PM2023-11-29T19:14:16+5:302023-11-29T19:15:00+5:30
शहरात रविवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे अजूनही वातावरणात गारवा कायम आहे.
नाशिक : शहरात रविवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे अजूनही वातावरणात गारवा कायम आहे. सकाळी सकाळी थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी डबके साचल्याने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल १२० डेंग्यू रुग्ण आढळून आले. महिनाभरात तब्बल २३२ रुग्ण आढळले. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ९८७ डेंग्यूचे रुग्ण आढळले. कामटवाडे परिसरात एका डेंग्यूबाधिताचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता औषध व धूर फवारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी अद्यापही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शहरात जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत १४४ डेंग्यूचे रुग्ण होते.
ऑगस्टपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. या महिन्यात डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात २६१ डेंग्यूचे रुग्ण आढळले.ऑक्टोबर महिन्यात एक हजार ३०० संशयित आढळले. त्यात १५० बाधित झाले. नोव्हेंबर महिन्यात एकूण २३२ रुग्ण आढळले. यातील शेवटच्या आठवड्यात १२० रुग्ण आढळल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले. नाशिकरोडपाठोपाठ कामटवाडे येथील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. दरम्यान, डासअळी निर्मूलनासाठी पुरविल्या जाणाऱ्या औषध व धुरासाठी वापरले जाणारे लिक्विड कमी प्रमाणात वापरले जात असल्याच्या संशयावरून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी मलेरिया अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी दिली.