जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:43 AM2023-09-18T08:43:45+5:302023-09-18T08:44:07+5:30
कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे.
नाशिक : जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४२३ बालके ही तीव्र कुपोषित असून २ हजार १७४ बालके मध्यम कुपोषित गटात आहेत. कुपोषित बालकांची एकूण संख्या ही अडीच हजारांपेक्षा जास्त असून, ही स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यंत्रणेस कुपोषण निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले असल्याचे नमूद केले.
यावेळी डॉ. पवार यांनी विशेषत्वे पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या आदिवासी तालुक्यांमध्ये बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यास कुपोषणमुक्त करण्यासाठी झपाटून कामास लागावे, असे आवाहन केले. कृषी योजनांचाही आढावा त्यांनी मांडला. त्या म्हणाल्या, कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. मागील आर्थिक वर्षात ११ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. १ हजार २७७ लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला आहे. याही वर्षात ७ कोटींचा निधी प्राप्त झाला असून १८ लाभार्थींना आतापर्यंत लाभ प्रदान करण्यात आला आहे.
कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी परंपरागत कृषी योजना ‘आत्मा’तर्फे राबविण्यात येते. यातून आतापर्यंत २३ लाखांचे काम झाले असून मागील आर्थिक वर्षात ३६८ लाभार्थी, तर १०७ लाभार्थींनी या वर्षात लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून गतवर्षी ठिबक सिंचन संच घेण्यासाठी १८ कोटी ८३ ला, तर यंदा ७ कोटींचा निधी असा एकूण २५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यातून ६ हजार लाभार्थींपर्यंत हा लाभ पोहोचला आहे. ही योजना ऑनलाइन असल्याने मागणीनुसार अनुदान वितरित करण्यात येत असते. यावेळी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात ४ पिंक व्हॅनचे चावी देऊन वितरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत ४ कोटींचे अनुदान उपलब्ध झाले यातून वेगवेगळे प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतीचा पोत सुधारण्यासाठी मातीचे परीक्षण केले जाते. ३६ हजार ५६९ कार्डचे वाटप मागील वर्षात झाले असून यावर्षीचा लक्ष्यांक ३८ हजार १५० असून त्यापैकी ३५ हजार ८०० कार्डचे वाटप पूर्ण झाले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून जमिनीची उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.