नाशिकमधील आसाराम आश्रम भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:03 AM2018-05-22T01:03:56+5:302018-05-22T01:03:56+5:30
आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदीकाठावर निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवली.
नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगणारा कथित आध्यात्मिक गुरू आसाराम याचा गोदावरी नदीकाठावरील पूररेषेतील अनधिकृत आश्रम महापालिकेने सोमवारी भुईसपाट केला. आश्रमामागील गोदाकाठालगत जमिनीखाली उभारलेल्या छुप्या खोल्याही उद््ध्वस्त करण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेने कारवाई पूर्ण केल्यानंतर आश्रमाने न्यायालयाकडून २८ मेपर्यंत स्थगिती आदेश आणला आहे.
आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदीकाठावर निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवली. सकाळी महापालिकेचा फौजफाटा पोलीस बंदोबस्तात आसाराम आश्रमात जाऊन धडकला. या वेळी काही आसारामभक्तांनी पथकाला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फार काळ टिकू शकला नाही.