आशा कर्मचाऱ्यांना बीएलओंची कामे देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 07:09 PM2019-09-25T19:09:36+5:302019-09-25T19:11:29+5:30
निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामीण भागात गावोगावी शासनाच्या योजना पुरविण्याबरोबरच आरोग्य सेवा करणाºया आशा स्वयंसेविकांना निवडणुकीचे कामकाज न देण्याचा निर्णय आरोग्य संचालकांनी घेतला असून, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते. बीएलओ म्हणून काम करताना मतदार नोंदणी करणे, मतदारांची माहिती गोळा करणे, त्यांची छायाचित्रे संकलित करणे, निवडणूक काळात मतदारांना मतचिठ्ठ्यांचे वाटप करणे आदी महत्त्वाची कामे आशा कर्मचारी करीत असतात. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणूक संबंधित कामे असल्यामुळे आजवर आशा कर्मचा-यांनी बीएलओंची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असली तरी यंदा मात्र देशपातळीवर राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य मोहीम सुरू असल्यामुळे निवडणुकीच्या कामाइतकेच या कामाला शासनाने प्राधान्य दिले आहे. परंतु तत्पूर्वीच आशा कर्मचा-यांना निवडणूक कामांच्या नोटिसा बजावण्यात आल्यामुळे आरोग्य अभियान अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत राष्टÑीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनी सर्व जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून आशा कर्मचा-यांना निवडणुकीचे कामकाज न देण्याच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व नागरी भागात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरू असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आशा स्वयंसेविकेस विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच आशा स्वयंसेविकांना निश्चित करून दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यास त्यांना कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना निवडणूक संदर्भातील बीएलओ तसेच निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राष्टÑीय आरोग्य अभियान हे विशिष्ट कालावधीकरिता राबविण्यात येत असून, अभियानाचे काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. सदर उद्दिष्टपूर्तीकरिता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना निवडणूकविषयक कामकाजाच्या जबाबदा-या दिल्यामुळे त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तरी आशा स्वयंसेविकांना बीएलओ व इतर निवडणुकीचे कामकाज देण्यात येऊ नये.