असहाब-ए-रसूल बाबा दर्गा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उरूसामध्ये घडणार दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 04:06 PM2019-08-11T16:06:16+5:302019-08-11T16:07:42+5:30
विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते.
नाशिक : संगमनेर, सिन्नर तालुक्यांच्या वेशीवर असलेल्या हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान हजरत असहाब-ए-रसूल बाबा दर्ग्यावर येत्या तीसऱ्या श्रावणी गरूवारनिमित्त (दि.१५)उरूस आयोजित करण्यात आला आहे. या एकदिवसीय वार्षिक यात्रोत्सवासाठी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यानिमित्त राज्य परिवहन महामंडळ संगमनेर आगाराने विशेष जादा बसेसची व्यवस्था केली असल्याची माहिती दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.
असहाब-ए-रसूल बाबा यांचा दर्गा पारेगावच्या हद्दीत आहे. नांदूरशिंगोटे येथून निमोणमार्गे तसेच वावीमार्गे बाबांच्या दर्ग्यावर पोहचता येते. सालाबादप्रमाणे यंदाही निमोण येथील भाविकांकडून पारंपरिक प्रथेप्रमाणे संदलची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येणार आहे. मिरवणूकीला सकाळी नऊ वाजता या गावातील सुन्नी नुराणी मशिदीपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. उरूसाचा समारोप गुरूवारी सायंकाळी करण्यात येतो. या एकदिवसीय यात्रेकरिता निमोण, वावी या दोन्ही गावांमधून थेट दर्ग्यापर्यंत दर अर्ध्या तासाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फे-या सुरू राहणार असल्याची माहिती दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे. नांदूरशिंगोटे येथून सावर्जनिक वाहतूकीच्या साधनांनी थेट निमोण व वावीपर्यंत पोहचता येते. बाबांच्या उरूसासाठी नाशिक शहर, सिन्नर, संगमनेर तालुक्यासह श्रीरामपूर तालुक्यामधील विविध गावांमधूनदेखील भाविक हजेरी लावतात.
दरम्यान, उरूसानिमित्त दर्गा परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था मुबलकप्रमाणात केल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते.