आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:41 AM2019-07-09T01:41:59+5:302019-07-09T01:42:21+5:30

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते.

 Ashadhi Vari, Property Function. I did not mind dislike, Tila Pandhari's. | आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

Next

संभाजी महाराज बिरारी, कंधानेकर

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते. सुखरूप ऐसा दूजा कोण सांगा। माझ्या पांडुरंगा सारीखाजो।। आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मासुद्धा भक्ताची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ।। पांडुरंगाचं आणि वारकऱ्याचं नातं म्हणजे बापलेकी समान आहे. सासरी नांदायला गेलेल्या मुलीला जशी दीपावली आणि अक्षयतृतीयेला माहेराहून भाऊ मला नेण्यासाठी येईल, चार-आठ दिवस माहेराला सुखाने राहील, तशीच अपेक्षा वारकऱ्यांची असते. तुका म्हणे मज आठवा। मूळ लवकरी पाठवा।। मनुष्य घर सोडून बाहेर गेला की, त्याला घरची आठवण नक्की येते. परंतु महाराष्ट्रातील वारकरी एकदा पंढरीच्या दिशेने चालू लागला की, त्याला घरची आठवण येत नाही, हा लाखो वारकºयांचा अनुभव आहे. घरासारखी व्यवस्था वारीत नसते. अप्राप्त परिस्थितीतसुद्धा वारकºयांच्या चेहºयावरती आनंद दिसतो. ज्ञानदेव तुकाराम... या भजनाचा आनंद घेत घेत वारकरी पंढरीच्या दिशेने चालतो. एकदा या पंढरीच्या वारीची जिवाला ओढ लागली की, प्रत्येक वर्षी वारीला जावे ही अपेक्षा मनामध्ये असते. मीसुद्धा आषाढी व कार्तिकी वारीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. आषाढी वारी ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टिळा पंढरीचा।। जावे पंढरीशी आवडे मनाशी। कधी एकादशी आषाढी हे।।’ आषाढी व कार्तिकी हे वैष्णवांचे बाजार आहे. तसेच ‘आषाढी निकट। आला कार्तिकीचा हाट।।’ शेतकरी एखाद्या पिकाचे पैसे आले, तर जसा वर्षभर पुरेल असे सामान भरून ठेवतो तसे वारकरी पंढरीच्या आषाढ व कार्तिक वारीला गेल्यावर वर्षभरासाठीचा भक्ती, ज्ञान, वैराग्य व प्रेमाचा बाजार करतात, त्यामुळे वारकरी भाविक यांना संसारातील उद्वेग जाणवत नाही. माणुसकीचा धर्म शिकवणारी वारी आहे. जात-पात, भेद-भाव, उच्च-नीच, वक्ते-श्रोते, गरीब-श्रीमंत याचा मेळावा म्हणजे पंढरीची वारी आहे.
पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. या वारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात. भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो.
जग, जीव, जनार्दन जाणून घेण्याची संधी म्हणजे वारी आहे. सामुदायिक पंगतीतील भोजन किती आनंददायी व ऊर्जा देणारे आहे हे कळते. आपले वैशिष्ट्य विसरून समरस होणे, आपला अहंकार बाजूला ठेवून जगणे, चालणे म्हणजे वारी होय. मनुष्याने देवाकडे केलेला प्रवास हा वारी शब्दाचा अर्थ आहे. केवळ पायी चालणे म्हणजे वारी होत नाही. आळंदी येथे लहानपणी वारकरी शिक्षणासाठी असल्यामुळे वारकरी साधना व उपक्र म मनात व नसानसात घर करून बसली आहे, त्यामुळे पंढरीची वारी हा वारकरी मंडळीचा साधन मार्गातील महत्त्वाचा घटक आहे. ‘जो करतो वारी। मी त्याची येरझार सारी।।’ तसेच ‘जो करतो पंढरीची वारी। तो काळाला मागे सारी।।’ पंढरीची वारी अनेक प्रकारची आहे, विधीची वारी नियम म्हणून, रु ढीची वारी आई-वडिलांची आज्ञा पालनार्थ, आवडीची वारी भक्तीची आवड म्हणून, ‘मज भक्तिची आवडी। सेवा व्हावी ऐसी जोडी।।’ सकाम वारी म्हणजे फल प्राप्त्यर्थ, तर निष्काम वारी जीवनमुक्तीचे सुख प्राप्त्यर्थ, अर्थात पंढरीची वारी एक साधना आहे आणि अशी वारी ज्यांना घडते ते वारकरी मोक्षाचे अधिकारी होतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे।।
(लेखक अ. भा. वारकरी  मंडळाचे पदाधिकारी आहेत)

Web Title:  Ashadhi Vari, Property Function. I did not mind dislike, Tila Pandhari's.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.