आश्रमशाळेतील विद्यार्थी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:00 AM2017-11-20T00:00:19+5:302017-11-20T00:00:39+5:30
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी (१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.
आॅनलाईन लोकमत
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी (१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.
मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश मडावी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी भोजनाच्या वेळी हजेरी घेत असताना प्रकाश मडावी बेपत्ता असल्याचे समजले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, तसेच नातेवाईकांनाही विचारपूस केली. परंतु प्रकाश आढळला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
यासंदर्भात देसाईगंज पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या तक्रारीची नोंद घेतली आहे. प्रकाश मडावी याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुरमाडी येथे आपल्या आजीकडे राहत असून वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. आठव्या वगार्पासून प्रकाश कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत शिकत आहे.
मागील वर्षीसुद्धा या आश्रमशाळेतून प्रकाश पळाला होता व गस्तीदरम्यान तो पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा आश्रमशाळेत आणून सोडले होते. आताही तो दिवाळीच्या सुटीनंतर १ नोव्हेंबरला आश्रमशाळेत आला व ५ तारखेला शाळेतून पळाला, अशी माहिती मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी दिली.
मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाश मडावी याच्या वर्गमित्राची चौकशी केली असता, प्रकाश हा कोकडीवरून देसाईगंजपर्यंत एका ट्रॅक्टरवर बसून गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता, प्रकाश हा ट्रॅक्टरने देसाईगंज येथील भगतसिंग वार्डापर्यंत आला. पुढे तो फवारा चौकाकडे गेला. त्यानंतर तो नेमका कुठे गेला, हे माहित नसल्याचे सांगितले. पोलीस तक्रार झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अजूनपर्यंत तो मिळाला नाही. त्यामुळे प्रकाश मडावी याचा शोधणे मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकरणाकडे ठाणेदार स्वत: लक्ष घालून तपास करीत आहेत.