तावडे प्रकरणी तक्रारदाराला विचारणा
By admin | Published: January 24, 2017 12:37 AM2017-01-24T00:37:19+5:302017-01-24T00:37:41+5:30
तावडे प्रकरणी तक्रारदाराला विचारणा
नाशिक : नाशिक भेटीवर आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीबाबत दिलेले आश्वासन निवडणूक आचारसंहिता भंग करणारे असल्याची दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या प्रशासनाने तावडे यांना क्लिन चिट देतानाच, या संदर्भात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडेच पुराव्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात तावडे नाशिक भेटीवर आले होते त्यावेळी संस्थाचालकांनी त्यांची भेट घेऊन शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे निवेदन सादर करून चर्चा केली असता, शिक्षक भरतीबाबत निवडणूक आचारसंहितेबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी त्यांना दिले. त्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमात वृत्त प्रसिद्ध होताच, पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कॉ. राजू देसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्ह्यात पदवीधर, जिल्हा परिषद, महापालिका व पंचायत समितीची निवडणूक आचारसंहिता सुरू असताना शिक्षक मतदारांना आमीष दाखविण्यासाठी तावडे यांनी सदरचे आश्वासन देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे देसले यांचे म्हणणे होते.
या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी नाशिकच्या प्रांत अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, तावडे यांच्या वक्तव्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुराव्यासाठी त्यांनी संस्थाचालकांचे जबाबही घेतले. (प्रतिनिधी)