अटी शर्तींसह क्लासेस सुरु करण्यास परवानगीसाठी पीसीसीडीएचे पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 07:22 PM2020-06-21T19:22:08+5:302020-06-21T19:24:45+5:30
लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी नाशिक जिल्हा खासगी क्लासेस संचालक संघटनेने केली आहे.
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी याठी खासगी कोचिंग क्लासेस संचालक सघनेने पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या तर दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मोठ्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना क्लासमध्ये पाठवायला तयार आहेत. परंतु शासनाची परवानगी नसल्याने अनेक क्लासेस संचालकांना क्लास घेता येत नाहीत. त्यामुळे येत्या एक जुलैपासून शाळा कॉलेजप्रमाणे, असे खासही क्लासेसही सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने रविवारी (दि.21) राज्याचे अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी क्लासेस सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन भूजबळ यांनी क्लासेस संचालकांना दिले आहे. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कॉम्पुटर व टाईपिंग क्लास सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्रही पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी संघटनचे जिल्हाध्यक्ष जयंत मुळे, सचिव लोकेश पारख, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, सहसचिव संजय कुलकर्णी, गंगापूररोड विभागप्रमुख सचिन जाधव, पंचवटी विभागप्रमुख उदय शिरोडे, शाम महाजन, विनायक हिरे, प्रदिप येवला, दिपक जाधव, कल्पेश जेजुरकर आदी क्लासेसचे संचालक उपस्थित होते.