कामगार उपआयुक्तांना विचारणा

By admin | Published: October 19, 2015 11:28 PM2015-10-19T23:28:35+5:302015-10-19T23:29:07+5:30

परिपत्रकातील संदिग्धता : घंटागाडी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न

Ask the Labor Deputy Mayors | कामगार उपआयुक्तांना विचारणा

कामगार उपआयुक्तांना विचारणा

Next

नाशिक : घंटागाडी कामगारांना नव्याने जारी झालेल्या परिपत्रकान्वये किमान वेतन कायद्यानुसार वाढीव फरक मिळावा, या मागणीसाठी घंटागाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने किमान वेतनातील वाढीव फरक देण्यास नकार दिल्याने महापालिकेने कामगार उपआयुक्तांकडे शासनाच्या परिपत्रकासंबंधी मार्गदर्शन मागविले असून, त्यानंतरच ठेकेदारांमार्फत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार दि. २४ फेबु्रवारी २०१५ पासून किमान वेतनातील वाढीव फरक आणि लागू असलेला विशेष भत्ता देण्याची मागणी महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी केली आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून घंटागाडी कामगार रोज सायंकाळी काम आटोपून महापालिकेच्या मुख्यालयात येत आहेत. सोमवारी (दि. १९) घंटागाडी कामगारांचे नेते महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे व डॉ. सचिन हिरे उपस्थित होते. यावेळी संबंधित ठेकेदारांनी घंटागाडी कामगारांना वाढीव फरक देण्यास असमर्थता दर्शविल्याने सदर परिपत्रकासंबंधी कामगार उपआयुक्तांकडे मार्गदर्शन मागविल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
कामगार उपआयुक्तांनी घंटागाडी कामगारांनाही सदर परिपत्रक लागू असल्याचे स्पष्ट केल्यास संबंधित ठेकेदारांनाही वाढीव फरक देण्यास बाध्य केले जाईल. प्रसंगी त्यांच्या बिलातून कपात करण्यात येईल, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले. याशिवाय मंगळवारी (दि.२०) महापालिकेचा वरिष्ठ अधिकारी कामगार उपआयुक्त कार्यालयात पाठवून माहिती घेतली जाईल, असेही सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, फाळके स्मारकातील कामगारांच्या मानधनाबाबतही लक्ष घालण्याचे आश्वासन सोनवणे यांनी दिले.

Web Title: Ask the Labor Deputy Mayors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.