फोडलेल्या रस्त्यांसाठी डांबर? देता... कोणी डांबर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:02+5:302021-02-06T04:24:02+5:30
नाशिक : कोरोनानंतर शहरात महापालिकेने भुयारी गटार आणि अन्य कामे धूमधडाक्यात सुरू केली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पावसाळ्यात खड्डे ...
नाशिक : कोरोनानंतर शहरात महापालिकेने भुयारी गटार आणि अन्य कामे धूमधडाक्यात सुरू केली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडले तेच बुजलेले नाहीत, तर फाेडलेले रस्ते कोठून तयार होणार. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून महापालिकेकडे डांबरच नसून निविदांच्या घोळामुळे आता फोडलेल्या रस्त्यांसाठी डांबर देते का कोणी... डांबर... असा प्रश्न करण्याची वेळी आली आहे.
दर पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. महापालिका ते ठेकेदारांमार्फत बुजवत असली तरी यंदा ऑक्टोबरनंतर अनेक भागांत अशा प्रकारचे खड्डे कायम आहेत. महापालिकेच्या ॲपवर तक्रार करणाऱ्यांनादेखील सध्या डांबर संपले आहे. ते उपलब्ध होताच खड्डे बुजवले जातील किंवा दुरुस्त केले जातील, असे नमूद केले जात आहे. त्यातच कोरोनाचे संकट सुरू असतानाही महापालिकेने अत्यावश्यक कामे सुरू केली. पावसाळ्यानंतर तर भुयारी गटार, जलवाहिनी टाकण्यासाठी अनेक भागांतील रस्ते फोडले आणि नंतर ते बुजवले असले तरी मातीने बुजवलेल्या या भागांत जणू मातीची गतिरोधके टाकण्यात आली आहेत, असा भास होतो. अनेक भागात डांबरी रस्ते खराब झाले, तर काही ठिकाणी साइडपट्ट्यादेखील खराब झाल्या आहेत; परंतु महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे दुरुस्ती केली जात नसून, डांबर उपलब्ध नाही, हेच कारण दिले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने सुमारे पंधरा कोटी रुपयांचे डांबर आणि अन्य दुरुस्ती साहित्य रेट कॉॅन्ट्रॅक्टने पुरवण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्या ज्यादा दराच्या असल्याने फेरनिविदा मागवण्यात आल्या. या घोळात मात्र फोडलेल्या रस्त्यांची अवस्था नागरिकांना त्रासदायक ठरली असून, केव्हा डांबर मिळणार, असा प्रश्न केला जात आहे.
इन्फो...
महापालिकेच्या वतीने डांबर आणि अन्य साहित्य मागवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, लवकरच त्यावर निर्णय हेाण्याची शक्यता आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापालिकेबरोबरच महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी आणि अन्य खासगी कंपन्यादेखील रस्ते फोडत असल्यानेदेखील नागरिक त्रस्त झाले आहेत.
...
(छायाचित्र : नीलेश तांबे)