उपनगर रस्त्याचे डांबरीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:22+5:302021-01-22T04:14:22+5:30
शिखरेवाडी, गंधर्वनगरीत खोदकामाचा अडथळा नाशिक : नाशिक रोड येथील गंधर्वनगरी आणि शिखरेवाडी मार्गावर ठिकठिकाणी पाइपलाइनसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. ...
शिखरेवाडी, गंधर्वनगरीत खोदकामाचा अडथळा
नाशिक : नाशिक रोड येथील गंधर्वनगरी आणि शिखरेवाडी मार्गावर ठिकठिकाणी पाइपलाइनसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या कामामुळे वाहनधारकांना मार्ग बदलावा लागला असून चारचाकी वाहनांची कोंडी होत आहे. पुढे काम सुरू असल्याचा फलक नसल्याने अनेक चारचाकी वाहनधारकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यांना अडकून पडावे लागते.
वडाळा रस्त्याची दुरवस्था कायम
नाशिक : सह्याद्री हॉस्पिटल ते वडाळा नाका रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. या मार्गावरील लॉन्स ते नासर्डी पूल तसेच अशोका मार्ग कॉर्नर या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
गढूळ पाणीपुरवठ्याची अजूनही तक्रार
नाशिक : नाशिक रोडमधील देवळालीगाव परिसरात तसेच राजवाडा, गुलाबवाडी भागात अजूनही गढूळ तसे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी महासभेत नगरसेवकांनीदेखील आवाज उठविला आहे. यावर तोडगा निघेल तेंव्हा निघेल मात्र पाण्याची तक्रार कायम आहे.
टाकळी, उपनगर परिसरात दुर्गंधी
नाशिक : टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रात सांडपाण्यावर होणाऱ्या प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. पहाटेच्या सुमारास टाकळी, उपनगर, जेल रोड, जामकरमळा, बोराडे मळा, लोखंडे मळा तसेच समतानगर या भागात या केंद्रातील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय अंधशाळा अजूनही बंदच
नाशिक : काेरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली शासकीय अंधशाळा अजूनही बंदच आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने शैक्षणिक वर्ग सुरू होत असताना अंधशाळेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने अंधशाळा बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. समाजकल्याण विभागाचे वसतिगृहदेखील अजूनही बंद अवस्थेतच आहेत.
आठवडे बाजारात चोरीच्या घटना
नाशिक : शहरातील बुधवार बाजारातून ग्राहकांच्या खिशातील पाकीट तसेच मोबाइल चोरीचे प्रकार वाढले आहेत. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा मोबाइल चोरणे, वाद घालून लूटमार करणे तसेच पाकीट मारण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडेदेखील तक्रारी दाखल झालेल्या आहेत.