मित्रांकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा घातपात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:57+5:302021-08-18T04:20:57+5:30
मागील वर्षी मार्च महिन्यात सातपूर येथील साई गार्डन सोसायटीमधील पाचव्या क्रमांकाच्या खोलीत अंकितचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात ...
मागील वर्षी मार्च महिन्यात सातपूर येथील साई गार्डन सोसायटीमधील पाचव्या क्रमांकाच्या खोलीत अंकितचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात अंकितच्या नातेवाइकांकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अंकितचा मृत्यू आकस्मिक नसून, तो घातपात असल्याचा फिर्यादी प्रमिला महानकर यांनी आरोप केला होता. त्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे पाठपुरावाही केला होता; मात्र पोलीस तपासात अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे त्याचा मृत्यू झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, प्रमिला महानकर यांनी याबाबत आक्षेप घेत त्याच्यासोबत त्या रात्री पार्टीसाठी असलेल्या मित्र-मैत्रिणींच्या वर्तणुकीवर आक्षेप घेत संगनमताने अंकितचा घातपात करत त्याचा खून केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात त्यांनी दाद मागितली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये सोमवारी (दि. १६) सातपूर पोलीस ठाण्यात सात मित्र-मैत्रिणींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पुढील तपास उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करीत आहेत.
--इन्फो---
बळजबरीने व्यसनासाठी पाडले भाग
संशयित मित्र-मैत्रिणींनी मृत अंकितला बळजबरीने व्यसन करण्याकरिता भाग पाडून त्यास जिवे ठार मारण्याची धमकी देत संगनमताने त्याचा खून केल्याचे फिर्यादी प्रमिला महानकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांचा मुलगा अंकित हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता आणि त्याच्यासोबत सातत्याने संशयित तरुण-तरुणींचे भांडण होत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. या भांडणाची कुरापत काढत अंकितला जिवे ठार मारल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
---इन्फो--
या तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल
संशयित ऋचा महेंद्र भारती (वय २२, रा. ता. खडकी, जि. अकोला), नमित राधेरमण मिश्रा (२२, रा. मुंबई), दीपकुमार गोपाल झा (२२, रा. जि. मधुबनी, बिहार), ऋषभराज वीरेंद्रकुमार सिन्हा (२३, रा. बिहार), लक्ष ललित जस्वाल (२१, रा. छत्तीसगड), मोनिका शिरीष वळवी (२७, रा. भाभानगर, मूळ नंदुरबार), ऋषिकेश विश्वनाथ दराडे (१९, रा. आडगाव) या संशयित विद्यार्थ्यांविरुद्ध मृत अंकितच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.