भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांचे मूल्यांकन
By admin | Published: September 2, 2016 11:41 PM2016-09-02T23:41:38+5:302016-09-02T23:43:29+5:30
एसीबीची कारवाई : येवला, मनमाड येथे मोजमाप
येवला/मनमाड : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या येवला व मनमाड येथील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आले. येवला येथील विंचूर चौफुलीवरील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या मालमत्तेची मोजदाद करण्यासाठी शुक्र वारी सकाळी एसीबीचे तीन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे सात अधिकारी अशा दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने मूल्यांकनाच्या कामास सुरुवात करून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल्यांकन पूर्ण झाले.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एसीबीचे तीन अधिकारी छगन भुजबळ यांच्या संपर्ककार्यालयात आले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मूल्यांकनाच्या कामास सुरुवात केली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच अधिकारी, (पान ९ वर)
तर सरकारी पंच म्हणून पंचायत समितीचे दोन अधिकारी यावेळी हजर होते, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मुंबई एसीबीचे ज्ञानेश्वर आवारे यांनी मूल्यांकनप्रक्रि येत कार्यालयातील सर्व साहित्याची मोजदाद केल्यानंतर वास्तूची लांबी व रु ंदी यासह उपलब्ध साधन सामग्रीची मोजदाद केली. पंकज भुजबळ यांच्या कार्यालयाची मोजणी
माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या मनमाड येथील रामकुंज बंगल्याचे व संपर्क कार्यालयाची मोजमाप करण्यात आली. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकरा अधिकाऱ्यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली.
भुजबळ यांचे पुत्र पंंकज भुजबळ हे २००९ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेशी संपर्क व्हावा यासाठी त्यांनी येवलारोडवरील रामकुंज हा भव्य व अलिशान बंगला विकत घेतला होता. याच ठिकाणी संपर्क कार्यालय व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बंगल्यावर छगन भुजबळसुध्दा कधी कधी हजेरी लावत होते.
मनमाड येथील रामकुंज येथे दुपारी दीड वाजता पहिले पथक दाखल झाले, तर दुपारी ३ वाजता दुसरे पथक दाखल झाले. दोन्ही पथकांनी बंगल्यासह संपर्क कार्यालयाचे बांधकाम तसेच मोकळी जागा याची मोजदाद केली.भुजबळ यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचीही सर्व मोजमापे शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे एसीबी पथकाचे प्रमुख ए. बी. आवारे यांनी सांगितले.
छगन भुजबळ व कुटुंबीयांविरोधात ज्ञात स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्या व कुटुंबींयाच्या नावावर वा त्यांनी धारण केलेल्या कंपनींच्या नावावर ज्या काही स्थावर मालमत्ता आहेत, त्यांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे.