पगारे यांचे आत्मकथन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे
By admin | Published: September 7, 2015 12:38 AM2015-09-07T00:38:58+5:302015-09-07T00:39:26+5:30
इंदिरा आठवले : अभिवादन सभेत केले मत व्यक्त
नाशिक : दिवंगत कवी कैलास पगारे यांचे अपुरे राहिलेले आत्मकथन चळवळीतील कार्यकर्ते आणि कविमित्रांनी लिहून पूर्ण करावे आणि त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अभिवादन सभेच्या अध्यक्ष प्रा. इंदिरा आठवले यांनी कैलास पगारे यांच्या अभिवादन सभेत व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात कैलास पगारे यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निधनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कवी, समीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या अभिवादन सभेत अनेकांनी कैलास पगारे यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच कवी कैलास पगारे यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा आवर्जुन उल्लेख केला. कैलास पगारे हे ग्रामीण भागातून शहरात दाखल झाले तरीदेखील त्यांनी ग्रामीण साहित्याची नाळ कधीच तोडली नाही, पगारे हे चळवळीतले कवी लेखक होते. त्यांचा स्थायीभाव लोकांना जागरूकतेचे बळ देत होता, असे प्रा. गंगाधर अहेर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी श्रीकांत बेणी, नंदकुमार कर्डक, प्रा. शंकर बोऱ्हाडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
अभिवादन सभेच्या सुरुवातीला कैलास पगारे यांच्या निवडक कवितांचे वाचन करून सुरुवात करण्यात आली. या अभिवादन सभेस काशीनाथ वेलदोडे, नितीन बागुल, मनोहर आहिरे, प्रकाश घोडके, अरविंद सुरवाडे, देवेंद्र उबाळे, सुरेश सावंत, किशोर पाठक, चंद्रकांत महामिने, डॉ. संजय जाधव, विवेक उगलमुगले आदि उपस्थित होते. अभिवादन सभेचे प्रास्ताविक प्रा. गंगाधर आहिरे यांनी, तर सूत्रसंचालन नितीन भुजबळ यांनी केले.