लाच घेताना वैज्ञानिक प्रयोगशाळेचा सहायक संचालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:56+5:302020-12-30T04:19:56+5:30
सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अकस्मात मृत्यूच्या घटनेतील मृतदेहाचा जुना व्हिसेरा तपासणीकरिता जमा करण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील विषशास्त्र ...
सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अकस्मात मृत्यूच्या घटनेतील मृतदेहाचा जुना व्हिसेरा तपासणीकरिता जमा करण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील विषशास्त्र विभागातील वर्ग-१मध्ये कार्यरत असलेल्या सहायक संचालक पांढरे यांनी दहा हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन त्यांच्याविरुध्द लाचेची मागणी करत असल्याची तक्रार नोंदविली. विभागाच्या पथकाने खात्री करुन सापळा रचला. साेमवारी प्रयोगशाळेच्या आवारात पांढरे यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयातील व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास त्यासंबंधी निर्भीडपणे तक्रार करत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विभागाकडून टोलफ्री क्रमांक १०६४ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली आहे.