कार्यालयात शिरून सहाय्यक वीज अभियंत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:04 PM2020-03-11T20:04:34+5:302020-03-11T20:06:35+5:30
थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : थकबाकीमुळे दुकानाचा विज पुरवठा खंडीत केल्याचा राग मनात धरून दोघांनी वीज कंपनीच्या कार्यालयात शिरून सहाय्यक अभियंत्यास बेदम मारहाण केल्याची घटना भद्रकाली उपनिभागीय कार्यालयात बुधवारी सकाळी घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गेलेल्या अभियंत्यास संशयितांनी पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारात गाठून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्फराज गफूर कोकणी (रा.बादशाह तंदूर,फाळकेरोड) व आयुब पठाण (रा.भद्रकाली) असे संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शशांक पेंढारकर (रा.कोणार्क नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पेंढारकर वीज कंपनीच्या भद्रकाली उपनिभाग कक्ष ३ या कार्यालयात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. वीज कंपनीच्या आदेशान्वये बुधवारी (दि.११) सकाळी कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने दोघा संशयीतांनी अकरा वाजेच्या सुमारास पेंढारकर यांचे कार्यालय गाठून कोणी आपली लाईट कट केली. असा जाब विचारत सहाय्यक अभियंता असलेल्या पेंढारकर यांना शिवीगाळ केली. यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह परिसरातील व्यावसायीकांनी धाव घेत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असता कोकणी याने पेंढारकर यांना मारहाण केली. यावेळी आयुब पठाण यानेही शिवीगाळ केली. या घटनेत पेंढारकर यांचा चष्मा तुटून नुकसान झाले असून वीज कर्मचाºयांनी संबधीताविरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे गाठले असता संशयीतांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येवून वीज कर्मचाºयांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.