गुंडाची भेट घेतल्याने आठवले वादात

By admin | Published: October 16, 2016 02:11 AM2016-10-16T02:11:28+5:302016-10-16T02:12:02+5:30

पवारची विचारपूस : पोलीस पडले बुचकळ्यात

The Athawate Votat | गुंडाची भेट घेतल्याने आठवले वादात

गुंडाची भेट घेतल्याने आठवले वादात

Next

नाशिक : पोलिसांवर दगडफेक करण्याबरोबरच घरात शस्त्रास्त्रे व घातक हत्यारे बाळगल्याने कारवाईस पात्र ठरलेले भाजपाचे नगरसेवक पवन पवार याची जिल्हा रुग्णालयात जाऊन केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी घेतलेली भेट वादात सापडली असून, त्याचा परिणाम पोलीस तपासावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका केंद्रीय मंत्र्याने गुन्हेगाराच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची बाबच मुळी असंवैधानिक असल्याचे मानले जात आहे.
तळेगाव येथील घटनेला प्रत्युत्तर म्हणून पवन पवार व रिपाइंचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाचे निमित्त साधून मंगळवारी त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी दुचाकी रॅली काढली व त्यानंतर शहरात ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या तसेच हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या आटोक्यात आणताना पोलिसांच्या नाकीनव आलेले असताना बुधवारी दुपारी नाशिकरोड येथे पोलिसांच्या सशस्त्र संचलनावर जेलरोड भागात दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक करताना नगरसेवक पवन पवार याने पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, परिणामी पोलिसांनी पवार याच्या भावासह तिघांना चोप देत ताब्यात घेतले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पवार याच्या निवासस्थानी तसेच कार्यालयाची झडती घेतली असता दोन पिस्तूल, काडतुसे, जांबिया, तलवार, गोणीभर दगड, मिरचीची पूड अशी शस्त्रास्त्रे सापडली होती. काही महिन्यांपूर्वी पवन पवार याने भाजपात प्रवेश केला व त्याच्या या प्रवेशाला आमदार बाळासाहेब सानप यांचे पूर्ण समर्थन होते. त्यामुळे सानपदेखील पक्षांतर्गत वादात सापडले होते. पवार याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असताना शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी जिल्हा रुग्णालयात तळेगाव घटनेतील पीडित बालिकेची भेट घेतानाच पवन पवार याचीही भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
विशेष म्हणजे आठवले यांना विशेष दर्जाची सुरक्षा असून, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाहणाऱ्या पोलिसांना घेऊनच त्यांनी पवार याची भेट घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: The Athawate Votat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.