पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडले; १९ लाख केले लंपास
By प्रसाद गो.जोशी | Published: September 27, 2023 12:44 PM2023-09-27T12:44:49+5:302023-09-27T12:44:56+5:30
आदल्या रात्री केला होता असफल प्रयत्न
गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत - येथील भरवस्तीमध्ये असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले आहेत. सोमवारी रात्री हे एटीएम लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी डाव साधून पोलिसांना आव्हान दिले आहे.
एक महिन्यापूर्वी चिंचखेड चौफुलीवर असलेले एच डी एफ सी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २८ लाख रुपयांवर डल्ला मारला होता त्यानंतर पुन्हा एक महिन्यांनंतर मंगळवार दि २६ रोजी भरवस्तीत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला होता .दरम्यान त्या एटीएमचे सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी नादुरुस्त केले होते ते बँक प्रशासनाने दुरुस्ती केलेच नाही त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा तेच एटीएम लक्ष करत त्यातून जवळपास १९ लाख ६ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला आहे. महिनाभरातील दुसऱ्या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.