अत्रे यांच्या परखड विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:37 PM2018-08-12T22:37:50+5:302018-08-13T00:32:43+5:30
आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
नाशिक : आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त ‘अत्रे कट्टा’च्या शुभारंभप्रसंगी भावे बोलत होते. रविवारी (दि. १२) सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, आजच्या काळातील कोणताही राजकीय नेता आचार्य अत्रे यांची उंची गाठू शकत नाही. अत्यंत उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व होते. कुणाच्याही चांगल्या कामाची ते मोठ्या मनाने स्तुती करत, परंतु त्याच व्यक्तीने एखादी चूक केली असे वाटले तर त्यावर कठोरपणे टीकाही करीत, मग ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असो, त्याची तमा आचार्य अत्रे बाळगत नसत असे सांगून भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘अत्रे कट्टा’ या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर अनिरुद्ध जोशी, डॉ. धर्माजी बोडके, नरेश कोठेकर, विसुभाऊ बापट, नानासाहेब बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोठे यांनीही आचार्य अत्रे यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबानी जोशी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी गोडबोले यांनी केले.
विडंबन संगीत ‘एकच प्याला’चे अभिवाचन
आचार्य अत्रे कट्टा शुभारंभानिमित्त अत्रे लिखित विडंबन संगीत ‘एकच प्याला’ या नाटकाचे अभिवाचन करण्यात आले. यात कवी विसुभाऊ बापट, उमा बापट, शिबानी जोशी, नरेश कोठेकर व उमेश घळसासी यांनी सहभाग घेतला.