नांदूरनाका परिसरात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार
By admin | Published: September 17, 2016 12:30 AM2016-09-17T00:30:34+5:302016-09-17T00:30:51+5:30
संतापजनक : संशयित नराधम पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : पाच वर्षीय चिमुरडीस शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़१४) सायंकाळच्या सुमारास औरंगाबादरोडवरील जॉकीनगर परिसरात घडली़ याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयित बंटी उर्फ सचिन हिरामण पाटील (वय ३४, रा़ रामदास, जॉकीनगर, औरंगाबादरोड नांदूरनाका, नाशिक) यास अटक केली असून, त्यास न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉकीनगर परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीस संशयित बंटी पाटील हा बुधवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास परिसरातील सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला़ या ठिकाणी या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर या मुलीला मारहाण करून या प्रकाराबाबत आई किंवा पोलिसांना सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली़
पीडित मुलगी घरी आल्यानंतर आईने ओल्या कपड्यांबाबत विचारणा केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले़ यानंतर या मुलीस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)