पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:46+5:302021-08-18T04:20:46+5:30
गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत परप्रांतीय भोंदूबाबा संशयित कामील गुलाम यासीन शेख (२९, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या ...
गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत परप्रांतीय भोंदूबाबा संशयित कामील गुलाम यासीन शेख (२९, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. गंगापूर) याच्यासह पीडित महिलेच्या पतीच्या ओळखीचे संशयित स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (५८, रा. मूळ आंध्रप्रदेश, सध्या रा. कामटवाडे), अशोक नामदेव भुजबळ (६३, रा. सातपूर) या दोघा संशयितांनी पीडित महिलेला पत्र्याच्या खोलीत बोलावून घेत पैशांचा पाऊस पाडण्याचे खोटे आमिष दाखविले. महिला खोलीत आली असता संशयित फर्नांडिस, भुजबळ यांच्या मदतीने पूजा करावी लागणार असल्याचे सांगितले. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात दर बुधवारी यावे लागेल, असे सांगत सलग तीन आठवडे बोलावून घेत वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित भोंदूबाबासह इतर दोघांविरोधात बलात्कार, विनयभंग, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
--इन्फो---
नग्नावस्थेत पूजेत बसण्यास पाडले भाग
संशयित कामील याने बनावट पूजा मांडून पीडितेला नग्नावस्थेत पूजेमध्ये सहभागी होण्याची अट ठेवली. यावेळी त्याने स्वत:हून पीडितेच्या शरीरावरील कपडे काढत सलग तीनवेळा शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यासाठी संशयित फर्नांडिस, भुजबळ यांनी त्यासाठी भोंदूबाबाला प्रवृत्त केल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे.
---इन्फो---
अंधश्रध्दा महिलेला भोवली
पैशांचा पाऊस पडणार या अंधश्रध्देतून महिलेने संशयित कामीलसह त्याच्या दोघा साथीदारांवर विश्वास दाखविला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करत त्यांच्या भोंदूगिरीची बळी ठरली. कुठल्याही पूजेद्वारे अशाप्रकारे पैशांचा पाऊस पडत नाही आणि संशयित तिघांकडून आपला गैरफायदा घेतला जात असून सहा ते सात महिने केवळ आशेवर ठेवून आपली फसवणूक केली जात असल्याची खात्री पटल्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठले.